लहान मुलांना घडवणं ही सोपी गोष्ट नाही; संदीप गिल यांनी सर्व शिक्षकांचे केले कौतुक

पुणे – मुलांनो तुम्ही भावी नागरिक होणार आहात. हे वय तुमचं खूप खेळायचं आहे, मात्र त्याबरोबरच तुम्ही चांगला आहार, व्यायाम करून अभ्याससुद्धा करा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करताना देशाचे उत्तम नागरिक व्हावा असा सल्ला देत पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी डी ई एस मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेतील बालगोपाळाशी संवाद साधला. निमित्त होतं, अनोख्या रक्षाबंधन सणाचे.

सामाजिक बांधिलकी जपत डी ई एस पूर्व प्राथमिक शाळेने रक्षाबंधन सणानिमित्त शहराचे पोलीस उपायुक्त संदीप गिल आणि दामिनी पथकाच्या प्रमुख अनिता मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस महिलांना राखी बांधून सण साजरा केला. अवघ्या दोन दिवसावर रक्षाबंधन आले आहे. यादिवशी पोलीस प्रशासनावर असलेला कामाचा भार लक्षात घेऊन शनिवारी अनोखी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.

शाळेतल्या मोठ्या गटाच्या विदयार्थ्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधली. नागरिकांना संरक्षण देणाऱ्या पोलीस खात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, डेक्कन एज्यूकेशन संस्थेचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी,शाळा समितीच्या अध्यक्ष राजश्री ठकार उपस्थित होते.

गिल म्हणाले, मी अगोदर शिक्षक होतो. मी खूप मेहनत केली. तशीच तुम्हीपण करा. खूप शिका, मोठे व्हा, देशाचे उत्तम नागरिक व्हा. लहान मुलांना घडवणं ही सोपी गोष्ट नाही असं सांगून, त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. चांगल्या गोष्टी, चांगलं वागणं कसं असलं पाहिजे हे मुलांना मनमोकळ्या गप्पामधून त्यांनी सांगितले. यावेळी मुलांना गुड टच आणि बॅड टच, अनोळखी व्यक्तीपासून सावध कसं राहायचं यांचे प्रात्यक्षिक दामिनी पथकाने दाखविले.