भारताकडून पाकिस्तानचा ४-०ने अत्यंत लाजिरवाणा पराभव, सुनील छेत्रीने गोल्सची केली हॅट्रिक

भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिपमध्ये (SAFF Championship 2023) विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी बुधवारी (21 जून) बंगळुरूच्या श्रीकांतीरवा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. भारतासाठी या सामन्याचा हिरो ठरला कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri). त्याने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानवर गोलचा पाऊस पाडला. छेत्रीने गोल्सची हॅट्ट्रिक केली. त्याच्याशिवाय उदांता सिंगने एक गोल केला.

भारतीय संघाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. पूर्वार्धातच त्याने दोन गोल केले. भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 10व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर 16व्या मिनिटाला पेनल्टीवर दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत स्कोअर 2-0 असा भारताच्या बाजूने होता. टीम इंडिया एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी उत्तरार्धातही सुरुवातीपासूनच पाकिस्तानी खेळाडूंवर दबाव बनवला. 74व्या मिनिटाला छेत्रीने पेनल्टी चुकवली नाही, आणखी एक गोल करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. छेत्रीनंतर उदांता सिंगने 81व्या मिनिटाला गोल करून 4-0 अशी आघाडी घेतली.