औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीय का? आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

मुंबई –मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाढला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपुर्ण स्वप्न आज पुर्ण करण्याची जबाबदारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे काय ? असा कडवा सवाल करीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी जोरदार तोफ डागली.

मुंबई भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नवीन मतांसाठी केलेली राजकीय बेगमी आणि मुंबईकरांमध्ये भ्रम पसरवविण्यासाठी केलेला प्रयत्न, मराठी तरुणांची माथी भडकविण्याचे जे उद्योग सुरू आहेत, त्याला योग्य वेळी आळा घालावा लागेल ते आमचे कर्तव्य मानून मुंबईभर “भाजपा जागर मुंबईचा” ही यात्रा आम्ही करणार आहोत़ असेही आमदार ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार पुढे म्हणाले की, महत्वाच्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतो आहे उद्या मुंबईकरांसमोर अशांतता निर्माण होऊ नये म्हणून आजच यावर भाष्य करणे आवश्यक आहे.प्रत्येक राजकीय पक्षाला आपले ध्येय धोरण, आपले कार्यक्रम मांडण्याचे स्वातंत्र आहे, आम्ही ते मान्य ही करतो. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणामुळे उद्या काही राजकीय प्रश्न निर्माण होणार असतील तर दुसरा राजकीय पक्ष म्हणून त्याकडे वेळीच जनतेचे लक्ष वेधले पाहिजे, त्यातील धोके जनतेच्या लक्षात आणून दिले पाहिजेत म्हणून आजची पत्रकार परिषद घेत आहे, असेही आमदार ॲड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लिम संघटनेचा पाठींबा अशी बातमी २२ आक्टोबरला सामनामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये काही लोकांचे फोटो ही प्रसिध्द करण्यात आले होते. कुणी कुणाला समर्थन द्यावे अथवा कुणी कुणाचे समर्थन घ्यावे, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण या घटनेकडे नीट पाहिले तर असे लक्षात येते की, स्व:च्या राजकीय स्वार्थासाठी, मतांची पेरणी करण्याचा एक नविन विचार हळुवारपणे या गटाने केला आहे.

या समर्थनामध्ये लांगूलचालणाचा राजकीय स्वार्थी वास आहे. एक नेरेटिव सेट करण्यासाठी आणि येणारी मुंबई महापालिका निवडणुकीत मतांच्या बेगमीसाठी केलेली ही पेरणी आहे. खरं तर त्यांना म्हणायचं होते “मराठी आणि मुस्लिम” पण राजकीय हुशारीने आणि थेट बोलायची हिंमत नसल्याने “मराठी मुस्लिम” असा शब्द वापरला गेला.

हे आम्ही का मांडतोय, कारण हा कार्यक्रम व हे नॅरेटिव्ह, विचारधारा पसरविण्याचे काम या गटाच्या भाटांनी सुरूवात केली आहे. लगेच काही माजी संपादकांनी मुलाखती दिल्या. तोही त्यांचा अधिकार आहे. हे सगळे आजी-माझी संपादक आपआपले शो करुन मुंबई महापालिकेच्या जागा तसेच अंधेरीची पोटनिवडणुक येथील मतांची टक्केवारी मांडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा होणार याची गणिते मांडू लागले आहेत. म्हणून हे गणित जे मांडले जात आहे त्यातील काही प्रश्न आम्ही मुंबईकरांसमोर मांडत आहोत.

हा सगळा प्रयत्न मराठी मतांना फसवणे आणि मुस्लिम मतांना भूलवण्याचे काम केले जातेय. जी शिवसेना आपण सगळयांनी पाहिली ती वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्‍या शिवसेनेने जातीपाती धर्माच्या विरहीत राजकारण करुन मतांची आखणी आणि बांधणी केली होती. म्हणून मा. उध्दव ठाकरे यांना आमचा सवाल आहे की, आज तुम्हाला जातीच्या नावाने मते मागण्याची वेळ का आली. उध्दवजी, तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करुन वैचारिक लोच्या केला तर आहेच त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत एक पाऊल पुढे टाकून तुम्ही लाल बावटयासोबत पण युती केलीत, पण तो तुमचा प्रश्र आहे.पण आता मुंबई महापालिका निवडणुकीत तुमचा परभव समोर दिसायला लागल्यावर समाजा समाजामध्ये विभागण्या का करु लागला आहात? धर्म आणि जात याची पेरणी का करताय ?

भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, “ना जात पर, ना धर्म पर, किये हुए विकास के काम पर आम्ही मते मागतो. तुम्ही मराठी मुस्लिम अशी मांडणी करताय मग मराठी जैनांना तुमचा विरोध का?, मराठी गुजराती तुम्हाला का चालत नाहीत?, मराठी उत्तर भारतीय का चालत नाही, मराठी हिंदू या विषयापासून तुम्ही फारकत का घेताय हा आमचा थेट सवाल उध्दवजी ठाकरे यांना आहे. भाजपाची भूमिका ही मराठी मुंबईकर अशी आहे. ना, जात ना धर्म ना भाषा ना भेद… जो मुंबईत राहतो तो आमचाच आणि मराठी तर आमचाच का असा प्रयत्न करावा लागतोय कसाबला मराठी सदरा आणि पायजमा घालावा लागतोय,एक महमदअली रोड आणि मालवणी ही दोन ‍ठिकाणे अशी आहेत तीथे कधी बुलडोझर चालत ना अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही असे आता ४३७ चौ किमी च्या मुंबईत ‍किती महमद अली रोड आणि मालवणी पॅटर्न तुम्ही करणार आहात? आम्ही हा प्रश्न नागरी व्यवस्थांच्या अंगाने हा प्रश्न विचारतोय आम्ही धर्माच्या विरोधात नाही, असेही आमदार ॲड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

आता विलेपार्ले, बोरिवली, सायन, परेल, गिरगाव, प्रभादेव, माहिम, विक्रोळी, भांडूप येथे महमद अली रोड आणि मालवणी पॅटर्न तुम्ही करणार हातात इथली शांतता भंग तुम्ही करणार आहात. अगोदर मुंबईकर त्रस्त आहेत. अनधिकृत बांधकामे तुम्ही रोखू शकला नाहीत, आता हे पेव चाळी, इमारतींच्या तोंडावर येणार आहे का? तुम्ही मतांची बेगमी त्यावर करताय म्हणजे अशा अनधिकृत गोष्टींवर कारवाईच होणार नाही.एका विशिष्ट समाजातील, विशिष्ट विभागातील तरुण कर्ण कर्कष आवाजातील बाईक व त्यांच्या आवाजाने मुंबईकर हैराण आहेत, अशा बाईकच्या आवाजाने मुंबईकरांची शांतता घालवता आहात का ?ज्या भागात काही विशिष्ट समाजाच्या लोकांना प्रवेश नाही त्यांना प्रवेश मिळावा म्हणून शिवसेनेचा हा गट मतांची बेगमी करते आहे काय म्हणून मुंबईकरांना आम्ही सावध करतोय, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाढला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपुर्ण स्वप्न आज तुम्ही पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे काय ?

ही नवीन मतांसाठी केलेली राजकीय बेगमी आणि मुंबईकरांमध्ये भ्रम पसरवविण्यासाठी केलेला प्रयत्न, मराठी तरुणांची माथी भडकविण्याचे जे उद्योग सुरू आहेत त्याला योग्य वेळी आळा घालावा लागेल ते आमचे कर्तव्य मानून मुंबईभर भाजपा जागर मुंबईचा ही यात्रा आम्ही करणार आहोत

या जागर मुंबईच्या यात्रेमध्ये लपून छपून बोलणा-यांवर थेट प्रश्न विचारण्याची गरज आहे. मतांसाठी लांगूलचालण करणा-यांना मुंबईकरांना सजक करण्याची आवश्यकता आहे.. मुंबईच्या विकासाच्या आड कोण येतेय हे मुंबईकरांना दाखवून देण्याची गरज आहे, जे भ्रम आणि खोटे पसरवत आहेत त्यांना उघडे पाडण्याची गरज आहे म्हणून जागर मुंबईचा ही यात्रा आम्ही मुंबईत नोव्हेंबर महिन्यात करणार आहोत. संपुर्ण मुंबईत फिरुन आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईकरांशी संवाद साधणार आहोत, जागर करणार आहोत अशी माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.