आयपीएलमधील कामगिरीवर संघ निवडायचा असेल, तर रणजी बंद करा; सरफराजला दुर्लक्षित केल्याने भडकले गावसकर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि एकदिवसीय मालिकेसाठी सरफराज खानचा (Sarfaraz Khan) भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही, ज्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) नाराज झाले आहेत आणि त्यांनी युवा क्रिकेटपटूंना सल्लाही दिला आहे. जर आयपीएलमधील कामगिरी हाच मापदंड मानला जात असेल तर या खेळाडूंना रणजी खेळू नका असे सांगून टाका, असे गावसकरांनी म्हटले आहे. स्पोर्ट्स टाकशी बोलताना गावसकर यांनी आपले मत मांडले.

आपले म्हणणे मांडताना गावस्कर (Sunil Gavaskar On Sarfaraz Khan) म्हणाले, “आयपीएलमधील कामगिरीवर संघाची निवड करायची असेल, तर रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत, आता त्याला संघात प्रवेश मिळवण्यासाठी काय करावे लागेल? जरी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसला तरी तो संघात निवडण्यास पात्र आहे.”

गावसकर थेट म्हणाले, “निवडकर्त्यांनी त्याच्याशी बोलून त्याला सांगावे की आम्ही तुझ्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे आणि त्याचा भविष्यात तुला फायदा होईल, अन्यथा सरफराजने रणजी खेळणे थांबवावे.”