मानलं शाहीर तुम्हाला… ! शाहीर हेमंतराजे मावळे यांच्याकडून शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार परत

पुणे : महाराष्ट्र शासनाने मॉल व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री परवानगी दिली, या धोरणाचा निषेध म्हणून शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दिलेला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यापाशी ठेवून, जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीच्यादिवशी महाराष्ट्र शासनाची सद्सद्विवेकबुद्धी जागी होवो, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्राध्या. संगीता मावळे, शाहीर महादेव जाधव, नगरसेवक योगेश समेळ, ह.भ.प.मंगलमूर्ती औरंगाबादकर, संजय कोंडे, अनिल दिवाणजी व प्रबोधिनीचे सेवाव्रती उपस्थित होते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, अनेक वर्षे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मी काम करत आहे. शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार करतो. महाराष्ट्र शासनाने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. शासनाच्यावतीने देण्यात आलेला हा पहिला पुरस्कार आहे.परंतु, सरकार जर अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर हा पुरस्कार स्वतःजवळ ठेवणे योग्य नाही, त्यामुळे हा पुरस्कार मी परत करत आहे. पूर्णपणे दारूबंदी शक्य नसली तरी असे निर्णय घेणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.