‘चर्मकार समाजाचा चपलांचा धंदा आहे धर्म नाही तसाच ब्राह्मणांचा पौरोहित्य करणं हा धंदा आहे धर्म नाही’

कोल्हापूर – राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर काय बोलायचं… आज वेगळंच सुरू आहे. जुन्या काळात व्ही शांताराम यांचा एक पिंजरा (Cage)  नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमात मास्तर तमाशा विरोधात होते मात्र त्या सिनेमातील तमाशात काय झाले मास्तर कमळीच्या मागे लागले आणि तमाशात तुणतुणे वाजवायला लागले अशी जोरदार टिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी केली.

कानाकोपऱ्यात लोकांना अन्न पुरवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government ) केले. समतेचा संदेश देणाऱ्या कोल्हापूरात चिखल उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी सरकारवर कोल्हापूरवासियांनी विश्वास ठेवला आणि पोटनिवडणूकीत विजय मिळवून दिला त्याबद्दल अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील उद्योग संपवण्याचा प्रयत्न होतोय. आर्थिक स्थिती मजबूत करणार्‍या महाराष्ट्राला मारु नका. सध्या भोंग्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ सुरू आहे. लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय. भोंगे पेट्रोल पंपावर लावा ना आणि सांगा किती पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत ते. यावर बोलायला लागलो की भाजपच्या नेत्यांनी सांगितले की ईडी आलीच. आम्ही घाबरणार नाही. हम बोलते रहेंगे… असा स्पष्ट इशाराही छगन भुजबळ यांनी दिला.

देवळात जाण्याचं आरक्षण फक्त तुम्हाला आहे का? अशी विचारणा करतानाच अरे द्याना आम्हालाही शिकायला… आमचा सर्वसामान्य माणूस शिकू दे ना समरपयामी… अशी मिश्किल टीकाही छगन भुजबळ यांनी केली. भाजप म्हणजे भारत जलाओ पार्टी आहे. सदावर्ते पवारसाहेबांच्या घरावर चालून गेले. आता ते राणा पतीपत्नी हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) म्हणत आहेत. त्यावेळी घरांवर चालून जाण्याचे योग्य नाही असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत आहेत मात्र पवारसाहेबांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी झोपला होतात का पवारसाहेबांच्या घरावर जाताना लाज वाटली नाही का? असा थेट सवालही छगन भुजबळ यांनी केला.

चर्मकार समाजाचा चपलांचा धंदा आहे धर्म नाही… सुतारकाम करणे हाही धंदा आहे धर्म नाही… तसा ब्राह्मणांचा पौरोहित्य करणं हा धंदा आहे धर्म नाही असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. आज देशातील सगळे विकायचं काम सुरू आहे. जे होतं त्याचा सत्यानाश हे करत आहेत. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण (OBC reservation) दिल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी दिली.