‘शरद पवारांसारख्या लोकशाही मानणाऱ्या नेत्याच्या घरावर हल्ला होणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी आज धडक दिली .आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे, त्याला  चोरांचे पुढारी शरद पवार जबाबदार आहेत, अशा तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनावेळी  एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधातला हा आक्रोश आहे, अशी तिखट प्रतिक्रिया या एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.

दरम्यान,  या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, एसटी संपाच्याबाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. न्यायालयाचा निर्णयही त्याच पद्धतीने लागला. त्यानंतरही कुठलीतरी एक अज्ञात शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. विशिष्ट गटाला चिथावणी देऊन आज जे कृत्य घडले आहे, त्यासाठी सातत्याने हालचाली सुरु आहेत. हे लोक वारंवार अशी कृत्यं घडवू पाहत आहेत.असं ते म्हणाले.

शरद पवार यांच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या नेत्याच्या घरावर हल्ला होणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सुप्रिया सुळे या आंदोलकांना निर्भयपणे सामोऱ्या गेल्या. त्यांनी चर्चा करण्याची तयारीही दाखवली. मात्र, समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरु होत, त्यावरून या आंदोलनाचे नेते कोण आहेत, त्यांचे संस्कार तपासावे लागतील. महाराष्ट्रात अशा आंदोलनांना स्थान असता कामा नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले.