महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु आहेत – संजय राऊत 

Mumbai – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे. खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.

दरम्यान,  शिवसेनेतील (Shivsena) 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती समजत आहे. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर (Vinayak Raut, Arvind Sawant, Rajan Vikhare, Gajanan Kirtikar, Bandu Jadhav, Omraje Nimbalkar) हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित  खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.