पाकिस्तान किक्रेटमध्ये राडा! PCB प्रमुखांनी बाबरचे Whatsapp चॅट केलं लीक

Zaka Ashraf Revealed Babar Azam Chat: अलीकडेच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशिद लतिफ (Rashid Latif) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पाकिस्तान बोर्डाने जवळपास ५ महिन्यांपासून पाकिस्तानी खेळाडूंना पगार दिलेला नाही. शिवाय झका अश्रफ कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) कॉल्स आणि संदेशांना उत्तरही देत नाहीत, असा खळबळजनक खुलासा लतिफने केला होता. मात्र आता झका अश्रफ यांनी लतिफ यांचे दावे खोडून काढले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झका अश्रफ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या. आणि म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराने कधीही त्यांच्याशी वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला (Babar Azam Whatsapp Chat Leaked) नाही.

बाबरशी आपण अजिबात बोललो नाही, अशी कबुली अश्रफने दिली. यानंतर त्यांनी मुलाखतकारासह व्हॉट्सअॅपचा एक लांबलचक मेसेज देखील शेअर केला, जे बाबर आणि पीसीबी सीओओ सलमान नसीर यांच्यातील संपूर्ण संभाषण होती. अश्रफ यांनी असे करण्यामागचा उद्देश हा होता की बाबरने त्यांना कॉल किंवा मेसेज केला नाही. परंतु हे मेसेज टीव्हीवर लाइव्ह दाखविण्यात आल्याची बाबरला माहिती आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे अश्रफ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अझहर अलीने म्हटले आहे की, पीसीबी प्रमुख किंवा कार्यक्रमातील लोकांनी बाबरला त्याचे संदेश लाइव्ह टीव्हीवर दाखवले जात असल्याचे सांगितले होते का, याची चौकशी झाली पाहिजे. आता हे प्रकरण कसे वळण घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.