कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला: बाळासाहेब थोरात

मुंबई – कसबा पेठ पोटनिवडणुकीतील (Kasba Bypoll Election) महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कबसा मतदारसंघात मागील तीन-चार निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून येत असे पण यावेळी चित्र बदलले आहे. भाजपाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, तरुण मुले नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत पण बेरोजगारीमुळे नोकरी मिळत नाही. भाजपाच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी त्रस्त आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सुशिक्षित, मध्यमवर्गीय जनताही भाजपासून दूर जात आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभव केला आहे. नागपूर ह्या भाजपाच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसने विधान परिषद, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव केला आहे. आज कसबा या भाजपाच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मोठा विजय मिळवला आहे.
कसबा पोटनिडणुक महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढली व ती विजयी करुन दाखवली. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळाला असता पण तेथे आम्ही कमी पडलो. पण एकूण चित्र पाहता जनतेमध्ये भाजपा तसेच शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे हे प्रचारवेळीही दिसले होते, हेच चित्र पुढेही कायम राहिल व राज्यात तसेच केंद्रात बदल झालेला दिसेल. कसबा मतदारसंघातून रविंद्र धंगेकरांच्या विजयासाठी जीवाचे रान करणा-या महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे व जनतेचे थोरात यांनी आभार मानले.