धोनीची सीएसके बनली आणखीन तगडी! धाकड अष्टपैलू बेन स्टोक्स १६.२५ कोटींसह चेन्नईत

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

इंग्लंड संघाचा धाकड अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले आहे. स्टोक्सला लिलावात विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, लखनऊ सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर चेन्नई सुपर किंग्जने १६.२५ कोटींच्या किंमतीत त्याला विकत घेतले आहे. यासह स्टोक्स आतापर्यंतचा आयपीएल लिलावातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. स्टोक्स २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता.(Ben Stokes is SOLD to CSK for INR 16.25 Cr).

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.