पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत रोहन बोपण्णा यासह युएस ओपन विजेत्या राम व सेलिसबरी यांचा सहभाग

पुणे : पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत युएस ओपनमधील विजेत्या राजीव राम व जॉय सेलिसबरी व चार भारतीय खेळाडूंनी पुरूष दुहेरीत सहभाग नोंदवला आहे. याशिवाय गतविजेती जोडी रोहन बोपण्णा व रामुकमार रामनाथन यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे.

दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे होणार आहे.

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या राम व चौथ्या स्थानी असलेल्या सेलिसबरी ही जोडी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत सहभागी झाली आहे. तीनवेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकवणाऱ्या या अमेरिका व ब्रिटिश जोडीचा 2022मधील मौसम यशस्वी ठरला आहे. या जोडीने सलग दुसऱ्यांदा युएस ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आणि याशिवाय तुरीन मध्ये एटपी मास्टर्स 1000स्पर्धेत विजेतेपद मिळवून वर्षाचा शेवट गोड केला.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, यूएस ओपन स्पर्धेतील विजेत्या राजीव राम आणि जो सॅलिसबरी या जोडीचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या खेळाडूंच्या सहभागामुळे दुहेरीतील चुरस आणखी वाढली आहे. दुहेरीत गतविजेत्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यासंह आणखी चार भारतीय खेळाडूंचा समावेश असल्याने ही स्पर्धा नक्कीच चुरशीची पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांसमोर सामने होत असल्यामुळे खेळाडूंना आपले वर्चस्व राखताना हे पाहायला मिळणे खूपच चांगली गोष्ट आहे आणि या मालिकेत देखील अशाच प्रकारचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव आणि एमएसएलटीए चे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, टेनिस विश्वातील अव्वल स्टार खेळाडूसह चार भारतीयांना मुख्य ड्रॉमध्ये पाहून मला आनंद झाला आहे. तसेच, यूएस ओपन स्पर्धेतील विजेत्या राजीव राम आणि जॉय सॅलिसबरी या जोडीचा खेळ अनुभवायला मिळणार ही आनंदाची बाब आहे. गतवर्षीच्या मालिकेत आम्ही भारतीय खेळाडूंची क्षमता अनुभवली आहे आणि त्यामुळे यावर्षीच्या मालिकेत घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर खेळताना त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दूनावेल आणि याही वर्षी ते चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.

स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणाऱ्या इतर मानांकित खेळाडूंमध्ये नॅथॅनियल लॅमन्स आणि जॅक्सन विरो या अमेरिकन जोडीचा समावेश आहे, ज्यांनी सॅन डिएगो येथे 2022 च्या सदर्न कॅलिफोर्निया ओपनमध्ये एकत्रितपणे प्रथम एटीपी टूर दुहेरीचे विजेतेपद जिंकले आणि सॅडिओ डुम्बिया आणि फॅबियन रेबोल या फ्रेंच जोडीचा समावेश आहे. याशिवाय माजी जागतिक नंबर-24 सँडर गिल आणि माजी जागतिक नंबर-28 जोरान वेलिगेन यांनी देखील 121 च्या एकत्रित क्रमवारीत कपात केली आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र ही स्पर्धा आयएमजीच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईड यांचे व्यवस्थापन लाभले असुन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला टाटा मोटर्सने प्रायोजित केले आहे.

गतवर्षी विजेतेपद पटकावणारे बोपण्णा आणि रामकुमार यावर्षी दुसऱ्या जोडीदाराबरोबर खेळणार आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बोपण्णा यावर्षी डचमन बॉटिक व्हॅन डी झांडस्चुल्प सोबत सहभागी होणार आहे.

साकेथ मायनेनी आणि युकी भांबरी हे दुहेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणारे अन्य दोन भारतीय खेळाडू आहेत. मायनेनी आणि भांबरी यांनी 2022 मध्ये एटीपी चॅलेंजर टूरमध्ये एकत्र खेळून सहा विजेतेपद पटकावले आहेत.

माजी यूएस ओपन चॅम्पियन मारिन सिलिक आणि गेल्या आवृत्तीचा उपविजेता एमिल रुसवुरी हे एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करतील, ज्यामध्ये 17 टॉप-100 खेळाडू आहेत. पात्रता फेरीचे सामने 31 डिसेंबरपासून सुरू होणार असुन तर मुख्य ड्रॉ 2 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.