Wakeup Punekar | पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ लोकचळवळ

Wakeup Punekar : पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ (Wakeup Punekar) ही लोकचळवळ सोमवार, दि. ५ फेब्रुवारीपासून सुरू करीत आहोत, अशी माहिती ‘#वेकअप पुणेकर’चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पुण्यातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रवीणकुमार बिरादार (Praveen Kumar Biradar), प्रथमेश आबनावे (Prathamesh Abnave), रोहन सुरवसे पाटील (Rohan Suravase Patil), मिलिंद गवळी (Milind Gawli) आदी उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले, “गेल्या दहा वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.”

पुणेकरांना भेडसावणारा ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने हाती घेत आहोत. पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढते आहे. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, रूग्णालये येथे जाण्यासाठी वाहनांचा वापर अनिवार्य झालेला आहे. पार्किंगची समस्या वाढते आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रसंग उदभवतात. दूर अंतरावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या कारणांनी ट्रॅफिक या मुद्द्याला महत्त्व देण्यात आले आहे. शहराच्या सर्व भागातील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स या ठिकाणी ‘#वेकअप पुणेकर’चे स्वयंसेवक थांबतील आणि वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा फॉर्म भरून घेतील. या प्रश्नावलीत समस्येवरील उत्तरेही अपेक्षित केलेली आहेत. १५ दिवसांनंतर या फॉर्म च्या आधारे माहिती संकलित केली जाईल आणि पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजनांची छाननी करून ती राबविण्यासाठी ‘वेकअप’ पुणेकर मार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येतील. वाहतुकीच्या कोंडीत ‘#अडकलाय पुणेकर’, ‘#वेकअप पुणेकर’ अशी घोषवाक्य लिहीलेले फलकही पूर्ण शहरात लावण्यात येतील, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

ट्रॅफिक आदी नागरी प्रश्नांवर या मोहीमा राबविण्यात सातत्य ठेवण्यात येईल. क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पोलीस प्रशासन, शाळा-महाविद्यालयांना या लोकचळवळीशी जोडून घेतले जाणार आहे. विविध विषयांवर परिषदा, कार्यशाळा घेतल्या जातील. संबंधित खात्याकडे पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजना मांडून त्याचा पाठपुरावा केला जाईल, या समस्यांसाठी सोशल मिडिया चा प्लॅटफॉर्मही वापरण्यात येईल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा