भारतीय जनता पक्षाच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या : एच. के. पाटील

मुंबई/शिर्डी – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार (Government of the Bharatiya Janata Party) हे लोकशाही विरोधी (Anti-democratic), जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे (Congress) मोठे योगदान राहिले आहे परंतु मागील ८ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलले असून जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात असून या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांना एच. के. पाटील मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन झाले व त्यानंतर प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. दुपारी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसऱ्या दिवशी सादरीकरण होईल.