काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसैनिकांवर अन्याय करत आहेत; सावतांचा हल्लाबोल

सोलापूर – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा काही मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचं पहायला मिळतं. सध्या निधी वाटपावरुन महाविकास आघाडीमधील या पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र असून त्याबद्दल जाहीर भाष्य केलं जात आहे. यातच आता शिवसेनेमुळे सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसैनिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सावंत म्हणाले, आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही,असं सांगत त्यांनी आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय असा इशाराही दिला आहे. सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.