सभागृहात विरोधकांनी साडीचा पदर खेचला अन् ‘ती’ मुख्यमंत्री होऊनच परतली…

नवी दिल्ली : तामिळनाडूचं राजकारण एखाद्या एक्शन पिक्चरच्या स्टोरीपेक्षा काही कमी नसतं… नुसता राडा… तामिळनाडूच्या राजकारणाच्या इतिहासात डोकावलं तर या राड्याचा कळस तेव्हा जाणवतो जेव्हा थलायवी जयललिता आणि तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यात भर सभागृहात झटापट झाली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या फक्त मनभेद, मतभेद नाही तर कट्टर बदल्या वाली दुष्मनी होती.

जया आणि करुणा यांच्यातील पहिली झुंज तेव्हा दिसली जेव्हा एमजीआरने मदुराई येथील एका रॅलीत करुणाला सांगितले की जयाला लोकांना संबोधित करू दे. तेव्हा करुणाने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. तेव्हापासून या दोघांत विस्तव देखील जात नव्हता. तस पाहिलं तर MGR आणि करुणा हे जिगरी यार होते. पण या घटनेनंतर दोघांत फूट पडली आणि MGR यांनी DMK ला रामराम करत AIADMKची स्थापना केली.

जया आणि करुणा यांच्यातील दुश्मनीचा खरा अंक सुरु झाला. तो तामिळनाडू विधानसभेच्या सभागृहात. तारीख होती 25 मार्च 1989… तामिळनाडू विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जात होता. द्रमुकचे प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी सभागृहात अर्थसंकल्पीय भाषण करण्यास सुरुवात करताच काँग्रेस आमदारांनी विरोधी पक्षनेत्या जयललिता यांच्या विरोधात पोलिस अलोकतांत्रिक पद्धतीचा वापर करत असल्याचा मुद्दा मांडला. जयललिताही सभागृहात उठल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आपल्यावर कारवाई केली आणि त्यांचा फोन टॅप केला जात असल्याची तक्रार केली.

काँग्रेस आणि एआयएडीएमके आमदारांच्या, तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले की, अर्थसंकल्प सादर होत असल्याने या विषयावर चर्चेला परवानगी देऊ शकत नाही. हा शब्द स्पीकरच्या तोंडून बाहेर पडताच विरोधी पक्षाचे सदस्य अनियंत्रित झाले आणि अण्णाद्रमुकचे सदस्य आरडाओरड करत सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. दरम्यान, विरोधी पक्षाच्या एका सदस्याने रागाच्या भरात करुणानिधींना धक्का देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांचा चष्मा जमिनीवर पडला आणि तुटला. एवढेच नाही तर अण्णाद्रमुकच्या एका आमदाराने अर्थसंकल्पाची पाने फाडली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

जयललिता विधानसभेतून बाहेर पडण्यासाठी उभ्या होत्या तेव्हा द्रमुकच्या एका सदस्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. द्रमुक आमदाराच्या या प्रयत्नात जयललिता यांच्या साडीचा पदर खाली पडला आणि जयललिताही जमिनीवर पडल्या, त्यानंतर त्यांचा आमदारांचा संताप अनावर झाला. यानंतर द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये जोरदार धराधरी झाली.

एआयएडीएमके सदस्याने द्रमुक सदस्याच्या मनगटावर फटका मारून जयललिता यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. सभागृहात जयललिता यांच्या सोबत झालेल्या वागणुकीमुळे त्यांना प्रचंड राग आला होता. त्याचवेळेस जयललिता यांनी शपथ घेतली कि हे राज्य जेव्हा महिलांसाठी सुरक्षित होईल तेव्हाच या सदनात पुन्हा पाऊल टाकेल आणि आता मुख्यमंत्री म्हणूनच सभागृहात प्रवेश करेल. करुणानिधींसमोर जयललिता यांचा अपमान करण्याच्या घटनेने राज्याच्या राजकारणात वैयक्तिक दुष्मनी वाढवण्याचे काम केले आणि जनतेमध्ये द्रमुकबद्दल नकारात्मक संदेश गेला.

विधानसभेतील या गैरव्यवहारानंतर अवघ्या दोन वर्षांनी म्हणजे 1991 मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणुका झाल्या. जयललिता यांच्या नेतृत्वाखालील AIADMK आणि काँग्रेस आघाडीने राज्यातील 234 जागांपैकी 225 जागा जिंकल्या आणि जयललिता प्रथमच राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. एका प्रकरणात जयललिता यांनी करुणानिधी यांना मध्यरात्री झोपेत उचलून लॉकअपमध्ये ठेवले होते. करुणानिधी पोलिसांसमोर कसे ओरडत होते, हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. करुणानिधींकडून अशा प्रकारे अपमानाचा बदला जयललिता यांनी घेतला. त्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुकमधील वाद विकोपाला गेले. हे दोन्हीही नेते आज हयात नसले तरी त्यांच्या दुष्मनीचे किस्से आजही चर्चिले जातात.