राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल,यापुढे बरेचजण गोत्यात येतील – भाजप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली आहे.

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. ईडीची कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्याचा टोलाही भातखळकर यांनी लगावला होता.