मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने नियुक्त केले निरीक्षक, अमित शहांकडे असणार ‘या’ राज्याची जबाबदारी

नवी दिल्ली-  विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाने सोमवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभेतील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक आणि सह-निरीक्षकांची नियुक्ती केली.

भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापनेसाठी सह-पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना उत्तराखंडचे केंद्रीय निरीक्षक, तर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे.

त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना मणिपूरचे सह-पर्यवेक्षक बनवण्यात आले आहे.तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची गोव्याचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांना गोव्याचे सह-पर्यवेक्षक बनवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत . यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय नोंदवला असून ते सरकार स्थापन करणार आहेत.