‘ताई .. तुमच्या पप्पांला याच मंदिर – मठातील जय सिद्धेश्वर स्वामी महाराजांनीच निवडणुकीत पराभूत केलंय’

सोलापूर – पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये भाजपने (BJP) घवघवीत यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेत भाजपवर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास टाकला. तर, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. दरम्यान, पराभव पचवता येत नसल्याने आता काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

योगी आणि महाराजांची जागा मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली आहे. योगी आणि महाराजांची (Yogi and Maharaj)जागा मठात असून ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं, असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले. वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी,’ अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, शिंदे यांनी केलेल्या या टीकेला भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ताई तुमचं दुःख आम्ही समजू शकतो 2019 ला तुमच्या पप्पांला याच मंदिर – मठातील जय सिद्धेश्वर स्वामी महाराजांनीच निवडणुकीत पराभूत केलंय. ताई तुमच्या काँग्रेसचा अस्त झालाय आता असा टोला देखील राम सातपुते यांनी लगावला आहे.