छोट्या इलीशाचा कलात्मक स्टार्टअप, कमाईतील अर्धा हिस्सा सामाजिक कार्यासाठी

लहानमुले ही मातीचा गोळा असतात, मातीच्या गोळ्याला जसा आकार द्याल, तसा तो गोळा सुंदर मूर्तीत उतरतो, तसच काही लहान मुलांचं देखील असतं, तुम्ही त्यांना जसं घडवणार तसे ते घडणार , आता हेच पहा पुण्यातील एन.आय.बी. एम रोड  येथील संदीप गोडांबे यांची अवघ्या सात वर्षांची कन्या इलीशा हिने स्वताचा एक छोट्या व्यवसाय म्हणजेच स्टार्टअप सुरू केला आहे. इलीशा लिटल इम्प्रेशन नावाने तिने हे स्टार्टअप सुरू केले आहे.

या स्टार्टअप अंतर्गत ती कलात्मक हँड पेंटेंट गिफ्टस बनवते आणि त्यांची विक्री करते. यामध्ये फ्रीज मॅगनेट, नेम प्लेट,डोअर हॅंगिंग, टी कॉस्टर असं बरचं काही बनविते. इलीशाची आई मिनल या स्वता सुंदर पेंटिंग करतात,इलीशा देखील तीच्या आईवर गेली आहे. इलीशा पुण्यातील संस्कृती शाळेमध्ये शिकते.इलीशा अवघ्या तीन वर्षांची असल्यापासून पेंटिंग करते. कोरोना काळात सर्वजण घरात अडकून पडले होते, लहानमुलांना तर मोबाईल शिवाय पर्यायच नव्हता, पण इलीशाने मात्र लॉक डाऊनमध्ये अनेक हँड पेंटिंग प्रॉडक्ट बनविले.

सुंदर पॅकिंग करून ते विकले देखील. मिळालेल्या नफ्यातून इलीशाने 50 टक्के पैसे हे सामाजिक कार्यासाठी वापरले. इलीशा आणि तीच्या आईने हे पैसे कोणत्याही सामाजिक संस्थेस न देता, स्वताच काही तरी सामाजिक कार्य करायचे ठरविले. इलीशाला प्राण्यांची फार आवड आहे. त्यांच्याबद्दल सहानभूती देखील आहे, जीवदयेचा विचार करून इलीशाने आजूबाजूच्या परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांसाठी,मांजरे, पक्षांसठी अन्न आणि पाणी यांची व्यवस्था केली.

पाणी आणि अन्न ठेवण्यासाठी लागणारे भांडी त्यांनी या पैशांतून खरेदी केली. पक्षांसाठी लागणारे दाणे यासाठी पैसे खर्च केले. इलीशाच्या वयाचा विचार करता तीचे हे सामाजिक कार्य खरंच वाखाडण्याजोगे आहे.

नुकत्याच झालेल्या महिला दिनी इलीशाने तीच्या ह्या हँडमेड वस्तूचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील सांते स्पा कुझीन येथे भरविले होते. तेथे अनेक मान्यवरांनी इलीशाच्या या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. इलीशाचे आज्जी अनीता चोपडा आणि आजोबा प्रवीण चोपडा यांना देखील त्यांच्या नातीच्या या उपक्रमांचे भारी कौतुक वाटते.