भाजपने लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आखला ‘हा’ मास्टर प्लान; विरोधकांची वाढणार डोकेदुखी 

Lok Sabha Elections 2024: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली. येथे त्यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देशभरात कॉल सेंटर सुरू करण्याबाबत सांगितले. यासोबतच आगामी काळात देशभरातील नगराध्यक्ष आणि नगर पंचायत अध्यक्षांची परिषद आयोजित करण्यासह अनेक मोहिमांवर त्यांनी चर्चा केली.

मंगळवारी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात देशभरात पक्षाचे कॉल सेंटर सुरू करण्याच्या योजनेबाबत सादरीकरणही करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे . पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या बैठकीत संघटना मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली, विशेषत: लोकसभेच्या त्या 160 कमकुवत जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पक्षाने अनेक महिन्यांपूर्वी तयारी केली होती, तेव्हापासून आपले दिग्गज मंत्री आणि नेते तैनात करून ‘लोकसभा प्रवास योजना’ मोहीम राबवत आहे.

मंगळवारच्या बैठकीत पक्षाने आता या सर्व 160 लोकसभा मतदारसंघात विधानसभा जागांवर स्थानिक नेत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या 160 लोकसभा मतदारसंघांतर्गत सुमारे एक हजार विधानसभा जागा येतात, ज्यावर पक्ष आता आपले राज्यस्तरीय नेते तैनात करणार आहे.
या वर्षअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबतही बैठकीत सादरीकरण करण्यात आले. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात राष्ट्रपिता जयंती देशभरात साजरी करण्यात येणार्‍या सेवा कार्याची तयारी आणि रणनीती ठरविण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.