पॅलेस्टिनी भागातून हमासचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी इस्रायलनं उचलले मोठे पाऊल

Israel Palestine War: पॅलेस्टिनी भागातून हमासचा (Hamas) पूर्णपणे बिमोड करण्यासाठी आपलं सैन्य गाझा शहरात (Gaza City) आतपर्यंत पोहोचून कारवाई करत असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इस्रायली सैनिक गाझा शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचले असून हमासच्या लपण्याच्या ठिकाणांची कसून नाकेबंदी करत आहेत, अशी माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी काल दूरस्थ पद्धतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गाझा शहरातल्या शाळा आणि रुग्णालयांच्या खाली अनेक किलोमीटरचे बोगदे खोदण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी या बोगद्यांमध्ये शस्त्रसाठा केला असून तिथून त्यांचा दूरसंचार कक्षही चालवला जात असल्याचं गॅलंट यांनी सांगितलं. हमासच्या अतिरेक्यांनी काल एका रुग्णालयातून इस्रायली सैन्यावर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा मारा केला तसंच सैनिकांना उत्तर गाझामधील एका शाळेत लपवलेली शस्त्रे सापडल्याचंही इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं.

तत्पूर्वी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमासविरुद्धचं युद्ध संपल्यानंतर, इस्रायल, अनिश्चित काळापर्यंत गाझा पट्टीच्या सर्वांगीण सुरक्षेची जबाबदारी घेणार असल्याचं सांगितलं. या शहरात मदत सामग्री पोहोचवण्यासाठी किंवा ओलिसांची सुटका झाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा विचार करण्यात येईल पण युद्धबंदी मात्र केली जाणार नाही असंही नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’