डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला राष्ट्रपती भेट देणार! कोकणातील वाहतूक बदल

रत्नागिरी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेले आंबडवे या गावाला ते भेट देणार आहेत. त्यामुळे भारताच्या इतिहास ही ऐतिहासिक भेट म्हणून बघितलं जात आहे. यासाठी दोन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या छावणीचं स्वरूप देखील प्राप्त झाले आहे.

राष्ट्रपतींच्या रत्नागिरी दौऱ्यांची तयारी मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. आंबवडे या गावातील शाळांना यामुळे पहिल्यांदा रंग देण्यात आले आहेत. फक्त निवडणूकांपुरता या गावाला अधुनमधून राजकीय नेत्यांची भेटी होत असत. त्यामुळे आंबवडे गाव अजूनही सोईसुविधापासून वंचित राहिला आहे. या गावात कोणतीही राष्ट्रीयकृत बँक नाही, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, मात्र त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानंतर या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी 118 अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड, 1 हजार 118 पोलीस, जलद कृतीदल, दंगा काबू पथक, एस आर पी एफ तुकड्या आणि बॉम्ब शोधक पथके तैनात करण्यात आली आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीमुळे कोकणातील वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आज म्हाप्रल चेकपोस्टकडून शेनाळेमार्गे मंडणगडकडे येणारी संपूर्ण वाहतूक शेणाले फाट्यापासून बंद राहणार आहे. तर खेड दापोली शहरामध्ये दापोली फाटामार्गे प्रवेश करणारी वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहतील. बाणकोटकडून पाचरळ फाटामार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाट्यापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. बाणकोट कडून पाचरळ फाटा-म्हापरळ- शेनाले फाट्यामार्गे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच म्हाप्रळ पेवे पंदेरीमार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे.