प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण, प्रियकराच्या मदतीनं रचला डाव

माढा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून प्रेमविवाहास मान्यता न दिल्याने पोटच्या मुलीने प्रियकरासोबत मिळून कट रचत वडिलांना बेदम मारहाण केली आहे. काल रात्रीच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन माढाच्या दिशेनं येत असताना हा सगळा प्रकार घडला. महेंद्र शहा असं या मुलीच्या पित्याचं नाव आहे.  मारहाणीनंतर महेंद्र शहा हे गंभीररित्या जखमी झालेत. याप्रकरणी माढा पोलिसांनी मुलीसह पाच जणांना अटक केलीये. तसंच यासंदर्भात आणखी तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

साक्षी शहाने माढा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साक्षीला तिच्या वडिलांनी व्यावसायिक कारणासाठी 7 ऑगस्ट रोजी सकाळी पुण्याला पाठवले होते. तेथील कामे उरकून ती पुणे सोलापूर शिवशाही बसने माढ्यास निघाली. प्रारंभी टेंभुर्णीपर्यंत तिकीट काढले होते, मात्र वडिलांनी तीला शेटफळ पर्यंतचे तिकीट काढून तिथे उतर मी तेथून तुला घेऊन जायला गाडी घेऊन येतो असे सांगितले. त्यानुसार ती शेटफळ येथे आली आणि ती आणि तिचे वडील हे दोघे स्वतःच्या गाडीतून माढ्याकडे येत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत आल्यावर मुलीने बाथरूमसाठी गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानुसार गाडी थांबली त्यातून मुलगी बाहेर आली, त्याचवेळी महेंद्र शहा हेही बाहेर आले. यावेळी अचानक अज्ञातांनी त्यांना मारहाण करून ते दोन मोटारसायकल वरून शेटफळच्या दिशेने निघून गेल्याचे मुलीने पोलीसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले होते.

प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीसांना शंका आली. त्यानंतर चौकशीत असे आढळून आले की, संशयीतांपैकी एका बरोबर साक्षी हिचे प्रेमसंबंध होते. परंतु वडिलांचा विरोध होता. त्यांनी दुसऱ्या मुलासोबत साक्षीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महंमद शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.