भाजप आमदार गणेश नाईकांना अटक होण्याची शक्यता; चाकणकरांनी दिले संकेत

नवी मुंबई – भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh naik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live in a relationship) संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केला होता. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणे. तसेच पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणे, अशाप्रकारचे गंभीर आरोप महिलेने केले आहेत. महिलेच्या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची देखील कारवाई केली जाईल, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्वीकार न करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.