अयोध्येचा राम कुणाला पावणार ?  राज ठाकरेच नव्हे तर आता आदित्य ठाकरेही जाणार अयोध्येच्या दौऱ्यावर 

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दरम्यान,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेवर होणारी टीका वाढली आहे. शिवसेना हिंदुत्त्वापासून दुरावल्याची टीका भाजपसह विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. यादरम्यान मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातीलाच आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. स्वतः आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्त्व येत नाही त्यासाठी हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, अशी टीका करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्या मनात आणि रक्तात देखील हिंदुत्त्व आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या अयोध्यावारीमुळे  हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून शिवसेना-मनसेतली (Shivsena-MNS) चुरस आणखी रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, अयोध्येचा राम आता नेमका कुणाला पावणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.