भाजपने ७२ तासांच्या आत खनिजवरील पीएसी अहवाल सार्वजनिक करावा – काँग्रेस

पणजी : भाजपने खनिज व्यवसाया संदर्भातील तथाकथित पीएसी अहवाल ७२ तासांच्या आत सार्वजनिक करण्याचे धाडस करावे असे आव्हान गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

एका दशकापूर्वी या अहवालाचा वापर करून काँग्रेसने ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, तद्‌नंतर भाजपने सरकार स्थापन करून या मुद्द्यावर बोलणेच बंद केले आणि हा आरोप सिद्ध करण्यासही त्यांना अपयश आल्याचे चोडणकर म्हणाले.

“भाजप हा अहवाल सार्वजनिक करण्यात अपयशी ठरल्यास, हे सिद्ध होईल की निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी मतदारांची दिशाभूल केली होती आणि त्यासाठी त्यांनी गोव्यातील जनतेची आणि कॉंग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे.” असे चोडणकर म्हणाले.

चोडणकर यांनी शनिवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. यावेळी एआयसीसी मीडिया प्रभारी अलका लांबा, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आनंद सुर्वे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर आदी उपस्थित होते.

खाण घोटाळ्यावरून काँग्रेसवर आरोप केल्यानंतर भाजपने दोनदा सत्ता काबीज केली. मात्र तपास करून पैसे वसूल करण्यात अपयश आले. या प्रकरणाची चौकशी करून पैसे का वसूल केले नाहीत हे आता स्पष्ट व्हायला हवे.’’असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर भाजपवर केलेल्या प्रत्येक आरोपाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. “मी केलेले आरोप काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यावर त्याची चौकशी करण्याची जबाबदारी माझी आहे. अन्यथा राजकीय फायदा घेण्यासाठी मी आरोप करत होतो, हे सिद्ध होईल.” असे ते म्हणाले.

केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे, मग त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यात कोणी रोखले, असा प्रश्न त्यांनी केला.

थ्री लिनियर प्रकल्प आणि कोळसा केंद्राबाबत भाजप, आप आणि टीएमसीने आपली भूमिका स्पष्ट करावी असेही आव्हान त्यांनी केले आहे.

“गोव्यातील लोक मोफत काहीही मागत नाहीत, परंतु गोवा कोळसामुक्त होईल की नाही आणि थ्री लिनियर प्रकल्प रद्द होणार की नाही याची हमी त्यांना हवी आहे. हे पक्ष या मुद्द्यांवर बोलत नाहीत कारण ते अदानी आणि जिंदाल यांच्याशी संबंधित आहेत, जे त्यांचे फायनान्सर आहेत.”असा आरोप चोडणकर यांनी केला.

अलका लांबा म्हणाल्या की, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये भाजपकडे 4847 कोटी रुपये आहेत, जे 2013-14 मध्ये फक्त 780 कोटी होते. हा पैसा कुठून आला हे भाजपने सांगावे.

आनंद सुर्वे म्हणाले की, बेरोजगारी, महागाई आणि थ्री लिनियर प्रकल्प यामुळे गोव्याचे नुकसान होत आहे. “आम्हाला भाजपला घरी पाठवायचे आहे आणि म्हणून आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देत आहोत.” असे सुर्वे म्हणाले.