ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव राज्यात वाढू लागला; औरंगाबादेत दोन जणांना संसर्ग

औरंगाबाद – राज्यात आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादेत दोन जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्रॉन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी आई, बहीण आणि वडील असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, येथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती.

ते ओमायक्रॉन बाधित आहेत की नाही, याचे निदान होण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब नमुना पाठविण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल शनिवारी मिळाला आणि त्यातून हा व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचे समोर आले. शिवाय आणखी एक 32 वर्षीय व्यक्तीला नाव या विषाणूची बाधा झाली आहे.

दरम्यान, राज्यात काल ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 20 नव्या बाधितांची नोंद झाली. यापैकी पुणे जिल्ह्यात 6, मुंबईमध्ये 11, साताऱ्यात 2, तर अहमदनगरमध्ये एक जण बाधित आढळला आहे. या 20 बाधितांपैकी 15 जण आंतररष्ट्रीय प्रवासी, एक जण आंतर्देशीय प्रवासी तर 4 जण त्यांचे निकट सहवासित आहेत. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनबाधित आढळलेल्यांची संख्या 108 झाली आहे. यापैकी 54 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.