रस्त्यांवर नागडी उघडी फिरू नको, हाच मी उर्फीला थेट इशारा दिलाय; चित्रा वाघ आक्रमक

मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील शीतयुद्ध आणखी पेटले आहे. नुकतेच चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. यानंतर आता उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाला पत्र लिहित अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांची तक्रार केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीला (Chitra Wagh vs Urfi Javed) इशारा दिला आहे.

उर्फी जावेदचे महिला आयोगाला पत्र
चित्रा वाघ यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे स्वत:ला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी उर्फीने पत्रात केली (Chitra Wagh vs Urfi Javed) आहे. यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

उर्फीने काल रात्री राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. तिने तिच्या पत्रात म्हटलंय की, चित्रा वाघ यांनी मला प्रत्यक्ष दिसल्यास थोबडवण्याची धमकी केली होती. त्यामुळे मला आता मुंबईत असुरक्षित वाटू लागले आहे. म्हणून महिला आयोगाकडून मला सुरक्षा पुरवण्यात यावी. मात्र उर्फीने तिच्या पत्रात कुठेही चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली नाही.

चित्रा वाघ यांचा उर्फीला पुन्हा इशारा
यावर औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांवर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या, जीवे मारण्याची मी कशाला देऊ. मी धमक्या वगैरे देत नाही. मी फक्त इशारा देते. रस्त्यांवर नागडी उघडी फिरू नको, हाच मी उर्फीला थेट इशारा दिलाय. बॉलीवूडमध्ये काम करते, तुमच्या रोलप्रमाणे तुम्हाला जिथे काम करायचे आहे तिथे करा. रस्त्यांवर उघडं नाचायची गरज नाही. आमचा आक्षेप रस्त्यांवर उघडे नाचण्याला आहे, तितकं समजण्याची कुवत असेल तर समजून घ्या, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

कोणते कपडे घालावेत, कोणते नाही, हे ठरवणे ज्याचा त्याचा मूलभूत अधिकार आहे. उर्फीच्या या म्हणण्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. उद्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या चौकात उर्फी उघडी नागडी नाचलेली तुम्हाला चालेल का? कपडे घाला एवढेच म्हणतोय आम्ही. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. परंतु जर तू उद्या अंडरपँट घालून रस्त्यांवर फिरली तर, लोकं दगडाने मारतील ना तुला असा टोला देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकाराला विचारला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कपडे काय घालायचे आणि काय नाही घालायचे हे ठरवण्याआधी कपडे घालायला शिका, हेच तर सांगतेय मी तुला, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.