भाजपातर्फे मुंबईत ३०० ठिकाणी होणार दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन

Mumbai – गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा नवरात्रोत्सव देखील भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साहात साजरा केला जाणार आहे. ४९ ठिकाणी थेट भाजपतर्फे गरबा, दांडिया आणि भोंडला याचे आयोजन केले जाणार आहे. तसेच भाजपाने विविध मंडळांना पुरस्कृत केले आहे. २४२ मंडळे ३०० ठिकाणी  उदे ग अंबे उदेचा नारा भारतीय जनता पार्टी देणार आहे. तसेच भाजपातर्फे मुंबईत ठिकाणी भव्य स्वरुपात १७ ठिकाणी दांडिया, भोंडलाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी दांडिया फेम कलाकरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच रंगशारदा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री   देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, दोन वर्षांनंतर तरुण-तरुणी दांडियांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे किमान तीन दिवस तरी दांडियाची १० वाजेपर्यंतची मर्यादा थोडी उशीरापर्यंत करत १२ वाजेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होईल, अशी आम्हाला आशा आहे. मुंबईकरांना माझे आवाहन आहे की, मुंबईकरांनी आम्ही आयोजित केलेल्या उत्सवात सामील व्हावे.

मुंबई भाजपा आयोजित आणि गोपाळ दळवी यांच्या पुढाकाराने काळाचौकी येथे भव्य मराठी दांडिया उत्सव आयोजित केला जाणार आहे. याठिकाणी सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. यासोबतच आमदार सुनिल राणे हे योगी नगर, कच्छी नगर येथे आयोजित करणाऱ्या उत्सवात दहा हजार जणांचा रोज सहभाग असेल. त्याठिकाणी कलाकार किंजल दवे आपली कला सादर करतील. आमदार प्रवीण दरेकर हे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, बोरिवली पश्चिम येथे कलाकार प्रीति – पिंकी यांच्या उपस्थितीत गरब्याचे आयोजन करतील.

खासदार गोपाल शेट्टी आणि पदाधिकारी संतोष सिंग प्रमोद महाजन क्रीडांगण, बोरीवली येथे प्रसिद्ध दांडिया क्विन फाल्गुनी पाठक, तर खा. मनोज कोटक हे कालिदास ग्राउंड, मुलुंड याठिकाणी सुप्रसिद्ध वादक हनीफ असलम, जान्हवी श्रीमनकर, भाविन शास्त्री यांना घेऊन नवरात्रोत्सवाचे आयोजन करतील. आ. अमित साटम हे जूहू येथील JVPD स्कीम येथे दांडियाचे आयोजन करणार आहेत. तसेच आमच्यातर्फे धर्मवीर संभाजी नगर उद्यान, मिलन सब वे येथे अरविंद कुमार आणि गायिका दिपांशी यांना घेऊन दांडियाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

माजी नगरसेवक भार्गव पटेल, हॉटेल सहारा स्टार, माजी नगरसेवक विनोद शेलार हे पावटे कंपाउंड, मलाड, आमदार अतुल भातखळकर हे अशोक नगर कांदीवली, आमदार कॅप्टन तमिल सेलवम हे CGS कॉलनी सायन, संतोष मेढेकर हे मेघवाडी जोगेश्वरी, देवांग दवे हे ठाकूर व्हिलेज, दीपक दळवी हे भांडूप, माजी नगरसेवक नील सोमैया हे निलम नगर, माजी नगरसेवक मुरजी पटेल हे शेर ए पंजाब, माजी नगरसेवक मंगेश पवार यांच्यातर्फे आदिशक्ती एकविरा माता क्रीडांगण, भांडूप गाव येथे, तर माजी नगरसेवक महेश पारकर हे शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व येथे गरबा तसेच दांडियाचे आयोजन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला माजी आमदार राज पुरोहित, अतुल शाह आणि मुंबई महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.