‘भाजपा ईव्हीएम नियंत्रित करून नव्हे तर सर्वसामान्य जनतेची सेवा करत मन जिंकून विजय मिळवते’

मुंबई : आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या अशी आग्रही भूमिका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत मांडली. राज्यात 48 जागा जिंकू हा अमित शाह यांचा दावा कशाच्या आधारावर? असा सवाल त्यांनी विचारला. ईव्हीएम सॅटेलाईटद्वारे नियंत्रित होत असल्याने भाजपला कौल मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ईव्हीएम मशीन नको. बॅलेट पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असं खैरे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अमित शाह मोठ्या मोठ्या घोषणा करतात. ४८ जागा महाराष्ट्रात जिंकू, ३६ जागा बिहारमध्ये जिंकू. हे कोणत्या मुद्द्यावरून सांगता. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केलं जातंय. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरच हवा, अशी मागणी आमचे सर्व नेते करणार आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ही मागणी अधिक आक्रमकपणे केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, खैरे यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, वय झाल्यानंतर बालिशपणाचे आरोप होणे साहजिकच म्हणावे . पण भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेची सेवा करत मन जिंकून विजय मिळवते हे नक्कीच खैरे साहेबांनी लक्षात घ्यावे .असं कुलकर्णी यांनी म्हटले आहे.