काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पक्षात गोंधळ; सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार?

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Election of Congress President)वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी पक्षांतर्गत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा पदभार स्वीकारण्यास तयार नाहीत, त्यामुळे दुसरा पर्याय काय? याबाबत काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 21 ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून ती 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, ‘मतदानासाठी प्रतिनिधींची यादी तयार आहे. आमच्या बाजूने आम्ही तयार आहोत. काँग्रेस कार्यकारिणीने निवडणुकीची तारीख ठरवायची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधींसह बहुतेक काँग्रेस नेत्यांचे असे मत आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, परंतु यावर राहुल गांधींच्या होकाराची प्रतीक्षा आहे.

राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, अशी भावना बहुतांश नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे यात शंका नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वत: तयार असणे आवश्यक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडल्यानंतर अनेक प्रसंगी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी गळ घातली, परंतु त्यांच्या वतीने त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. आता अध्यक्ष निवडीची दिशा त्यांच्या ‘होय आणि नाही’ वर अवलंबून आहे.

पर्याय काय ?

गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणी अध्यक्ष झाले, तरी अशा परिस्थितीतही राहुल गांधी पक्षाचा प्रमुख चेहरा राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास काही पर्याय आणि नावांवर चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव चर्चेत असलेल्या पर्यायी नावांमध्ये प्रमुख आहे. गांधी घराण्याचा त्यांच्या नावावर फारसा आक्षेप नाही. मात्र, गेहलोत हे मुख्यमंत्रीपद सोडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक नसल्याचेही बोलले जात आहे.