भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

मुंबई – भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भंडारा येथे कार्यक्रमावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा होता आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढे किमान समान कार्यक्रम राबविला जाईल.

सरकारमधील तीनही पक्ष बरोबरचे भागिदार आहेत आणि त्याचा विरोधकांना त्रास होत आहे. मविआ सरकार अस्थिर व्हावे यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करुन, राजभवनच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्याने भाजपाचा जीव कासावीस झाला आहे परंतु महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल.