मोदी सरकारच्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपाची मोहीम

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आहे. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सुरू केला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष व जनसंपर्क मोहिमेचे संयोजक जयप्रकाश ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश सचिव श्वेता शालिनी व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या आठ वर्षाच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घटनेचे ३७० वे कलम रद्द करणे किंवा अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर उभारणे असे महत्त्वाचे विषय त्यांनी मार्गी लावले. त्यांनी गरीब कल्याणासाठी मिशन म्हणून काम केले. देशात ९ कोटी गॅस कनेक्शन देणे, दोन कोटी घरांना वीज कनेक्शन देणे, सहा लाख गावे हागणदारीमुक्त करणे, सामान्य लोकांची ४२ कोटी नवी बँक खाती उघडणे असे सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याची अनेक कामे मा. मोदी यांनी यशस्वीरित्या केली. त्यांचे हे काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदेश भाजपाने मोहीम सुरू केली आहे.

ते म्हणाले की, मा. मोदी यांनी ३१ मे रोजी देशभरातील लाभार्थींना व्हर्चुअल पद्धतीने संबोधित केले. त्यामध्ये राज्यातील ५७२ ठिकाणाहून लोक सहभागी झाले. भाजपाच्या किसान मोर्चाने १ मे रोजी राज्यातील २९५ ठिकाणी शिवार सभा आयोजित करून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. महिला मोर्चातर्फे आज राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुसूचित जाती मोर्चातर्फे बाबासाहेब विश्वास रॅली काढण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती मोर्चातर्फे बिरसा मुंडा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा मोर्चातर्फे राज्यात ठिकठिकाणी विकासतीर्थ रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देणारी पत्रके लोकांना देणार आहेत.

जीएसटीच्या भरपाईच्या थकबाकीवरून महाविकास आघाडी सरकार कांगावा करत आहे. याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, असे आवाहन आपण केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना करणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.