नाशिक पदवीधर मतदारसंघ नेमका कुणी कुणाचा केला गेम ? सत्यजित तांबेच्या मागे भाजपचा अदृश्य हात ?

नाशिक – नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाचा गोंधळ शेवटपर्यंत पाहिला मिळाला. काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे(Satyajit Tambe)  यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले होते. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता, पण त्यांनी अर्जच भरला नाही.

अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. भाजपने इतर चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. फक्त अपवाद नाशिकचा आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे भाजप आता तांबे यांना पाठींबा देईल अशी शक्यता दिसत आहे.

दरम्यान,जर सत्यजित तांबे अपक्ष फॉर्म भरल्यानंतर आपण काँग्रेसचाच कार्यकर्ता असं म्हणतायत, तर पक्षानं आधीच त्यांना अधिकृत उमेदवार का जाहीर केलं नाही ? सुधीर तांबे यांना आपल्या मुलासाठी माघारच घ्यायची होती तर त्यांनी काँग्रेसचा दुसरा उमेदवार रिंगणात येणारच नाही याची खबरदारी घेतली का? महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार असं सत्यजित स्वत:च जाहीर करत आहेत, पण काँग्रेससह इतर पक्षांची याला मान्यता होती का? हे आणि असे असंख्य सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत.