धक्कादायक! तृणमूल काँग्रेस बुथ अध्यक्षाच्या घरात मोठा बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात तृणमूल काँग्रेसचे बुथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या जाहीर सभेआधीच हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर घटनेवरून पश्चित बंगालमधील राजकीय हिंसाचार टोकाला गेल्याचे दिसते.

पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवार (२ डिसेंबर) रोजी रात्री स्फोट झाला. या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या बॉम्बस्फोटात अन्य काहीजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट एवढा शक्तीशाली होता की त्यामध्ये बूथ अध्यक्षाचं संपूर्ण घर उध्वस्त झालं. घराचं छप्पर अक्षरश: उडून गेलं.