‘इथे असते तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं’, उदयनराजे भोसलेंचा चढला पारा

रायगड: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वकव्य करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपाची आज उदयनराजे भोसले यांनी कानउघडणी केली. शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोश्यारी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपाविरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. “राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली, तर लोकांना भाजपानं उत्तर दिलं पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही. त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत”, असं उदयनराजे भोसलेंनी यावेळी सांगितलं.

“शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याचं विकृतीकरण होतंय. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना हटवलंच पाहिजे. राष्ट्रपती देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही”, असंही उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.