‘राष्ट्रवादीच्या दहा भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार, पाच नेत्यांची कागदपत्रेही तयार’

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास  यंत्रणांना देणार असून यातील पाच जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी केला आहे. आपण तक्रार देणार असणाऱ्या दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयकडे (ED and CBI) देणार असल्याचे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.

सिंचन घोटाळा प्रकरणात (Irrigation Scam Case) अजित पवार (Ajit Pawar) याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला.