फटकेबाजी सूरु : शिंदेच्या भाषणाचे व्हिडीओ शेअर करत म्हस्केंनी विरोधकांना डिवचले 

मुंबई – शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Shiv Sena spokesperson Naresh Mhaske) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केलेल्या काही भाषणातील मुद्दे काढून लागोपाठ नऊ ट्विटस केली आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी भाषणातील काही अंश ट्विट करून शिवसैनिकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबद्दल उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व वक्तव्यासोबत ‘फटकेबाजी सूरु’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. आधी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विसर न व्हावा असे कॅम्पेन रन करून त्यांनीच केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली होती..त्यानंतर स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनातील वेदना मांडण्याचा प्रयत्न म्हस्के यांनी केला होता. त्यानंतर आता त्यानी मुख्यमंत्र्यांची भाषणातील वक्तव्ये ट्विट करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात काय तर दसरा मेळावा होण्यापूर्वी सोशल मीडियावर देखील त्यांची उत्सुकता वाढावी यासाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रयत्न केल्याचे या व्हिडिओतुन दिसून येत आहे.