‘मालकाच्या सुमार गुणवत्तेचे पितळ उघडे पाडणाऱ्या टेलीप्रॉम्प्टरवर इडी, सीबीआयची कारवाई करता येईल का?’

पुणे : आपल्या बेधडक भाषणासाठी जगभरात ख्याती असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक भाषण सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र हे भाषण त्यांच्या खास शैलीसाठी वा बेधडकपणासाठी नव्हे तर या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या उडालेल्या गोंधळामुळे प्रचंड चर्चेत आहे.

या प्रकरणावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी देखील या प्रकरणावरून पंतप्रधानांवर सडकून टीका केली आहे. ‘ऐनवेळी बंद पडून मालकाच्या सुमार गुणवत्तेचे पितळ उघडे पाडणाऱ्या टेलीप्रॉम्प्टरवर इडी, सीबीआय, आयटी, एनसीबीकडून कारवाई करता येईल का? एक प्रामाणिक शंका!’ असा टोला हरी नरके यांनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण ?

भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.