बच्चू कडूंचीही आमदारकी रद्द करा, राष्ट्रवादीची पुण्यात बॅनरबाजी

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या विरोधात बॅनर झळकले आहे. बच्चू कडूंची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहेत. दरम्यान, या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, आमदार बच्चू कडूंना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यांची आमदारकी कधी रद्द होणार, नियम सर्वांना सारखेच पाहिजे. असे त्यावर लिहिले आहे.

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने बच्चू कडू यांना सवाल केला असता आमदार म्हणाले की, “ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाहीत. ही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत.”