‘मी गांधी आहे काही करू शकतो काही बोलू शकतो हा गैरसमज राहुल गांधी मधून जात नाही’ 

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.(rahul gandhi disqualified) राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

दरम्यान, कॉंग्रेसकडून या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला जात असताना भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी अहंकारी आहे हे काँग्रेसमध्ये असताना आम्ही जवळून पाहिले, मी गांधी आहे काही करू शकतो काही बोलू शकतो हा गैरसमज राहुल गांधी मधून जात नाही. ते खासदार म्हणून कधी वागलेच नाहीत, खासदारकीचा वापर फक्त सभागृह बंद पाडण्यासाठी केला, देशासाठी नाही मग खासदारकी गेली त्यात दुःख कसलं? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.