कारमध्ये डिझेलऐवजी चुकून पेट्रोल भरलं गेलं तर त्वरित करा ‘हे’ काम, नाहीतर इंजिनचे होऊ शकते मोठे नुकसान

आपल्या देशात प्रामुख्याने वाहने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरच चालतात. डिझेल (Diesel) इंजिन असलेले वाहन पेट्रोलवर चालू शकत नाही आणि पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनात डिझेल टाकले जात नाही. परंतु कधी चुकून गाडीच्या टाकीत चुकीचे इंधन टाकले तर गाडीच्या इंजिनला मोठे नुकसान होते. पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्याने जेवढे नुकसान होते, तेवढे नुकसान डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकल्याने होत नाही.

याचे कारण असे की डिझेल लुब्रिकेशन ऑईलप्रमाणे काम करते, ज्यामुळे इंधन पंप आणि इंजिनला जोडलेले इतर भाग व्यवस्थित काम करतात. डिझेलच्या टाकीत पेट्रोल टाकले तर गाडी सुरू होताच ते इंजिनच्या प्रत्येक भागात पोहोचते. डिझेलमध्ये मिसळल्यावर पेट्रोल सॉल्व्हेंट म्हणून काम करू लागते. त्यामुळे वाहनाच्या पार्ट्समधील घर्षण वाढते. परिणामी इंधन लाइनसह पंप खराब होऊ शकतो. यासोबतच इंजिनचेही मोठे नुकसान होऊ शकते.

वाहनात तेल घालताना नेहमी काळजी घ्या. पेट्रोल पंपावर तेल टाकणाऱ्या व्यक्तीला तुमच्या गाडीत पेट्रोल टाकायचे की डिझेल हे स्पष्टपणे सांगा. वाहनाच्या तेलाच्या टाकीच्या झाकणावर नेहमी पेट्रोल किंवा डिझेलचे स्टिकर लावा. चुकून डिझेल वाहनात पेट्रोल टाकले तर दोन गोष्टी ताबडतोब केल्या तर तुमच्या वाहनाचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

कार सुरू करू नका
तुमच्या वाहनाच्या टाकीमध्ये डिझेलऐवजी पेट्रोल टाकल्यावर कधीही वाहन सुरू करू नका. तुम्ही वाहन सुरू केल्यास डिझेलमध्ये मिसळलेले पेट्रोल लगेचच इंजिनापर्यंत पोहोचते. असे होणे अत्यंत धोकादायक आहे आणि यामुळे वाहनाचे अनेक भाग खराब होतील. त्यामुळे वाहनात चुकीचे इंधन टाकल्याचे समजले तर वाहन बाजूला ढकलून मेकॅनिकला बोलवा.

एक इंचही गाडीला हलवू नका
आपण गाडील डिझेलऐवजी पेट्रोल टाकले आहे आणि लगेच वाहन सुरू केले आहे किंवा चालवले आहे, असे तुम्हाला काही वेळानंतर समजले, तर लगेच वाहन थांबवा. वाहन काही फूट चालवल्यास किंवा काही सेकंदही चालवल्यास तुम्हाला हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. अशावेळी वाहन बंद करून बाजूला ठेवा आणि मेकॅनिकला बोलवा.

इंधन टाकी पूर्णपणे स्वच्छ करा
पेट्रोल मिश्रित डिझेल वाहनातून पूर्णपणे काढून टाका आणि टाकी पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुम्ही वाहन सुरू केले नसेल, तर टाकीमधून इंधन काढून टाकणे आणि इंजिनकडे जाणाऱ्या पाईपमधून इंधन टाकून टाकणे ही युक्ती वापरावी.  जर तुम्ही चुकीच्या इंधनाने कार सुरू केली असेल, तर तुम्हाला इंजिनही साफ करावे लागेल. मेकॅनिकला इंजिन उघडून इंजिनमध्ये गेलेले सर्व तेल बाहेर काढावे लागते. असे केल्याने, तो वाहनाच्या कोणत्या भागांचे नुकसान झाले आहे हे देखील तपासेल.