चोरीच्या संशयावरून दलित मुलांना अमानुष मारहाण प्रकरण; रामदास आठवले हरेगावला जाणार

Ramdas Athawale  –कबुतरे, शेळी चोरल्याच्या संशयावरून दलित मुलांना झाडाला उलटे टांगून अत्यंत अमानुष बेदम मारहाण झाल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर च्या हरेगाव मध्ये उघडकीस आला आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या माणुसकीला कलंक लावणाऱ्या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. येत्या दि. 1 सप्टेंबर रोजी  रामदास आठवले हरेगाव ला घटनास्थळी भेट देणार असून पीडित दलित मुलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून ज्यांनी कायदा हातात घेऊन हरेगाव मधील दलित मुलांना अमानुष मारहाण केली.त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

रिपाइं चे अहमदनगर चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,भीमराज बागुल यांनी रिपब्लिकन पक्ष आणि सर्व पक्षीय मोर्चा काढून हरेगाव मधील दलित मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध केल्याची माहिती दिली.हरेगाव दलित अत्याचार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलांना न्याय मिळावा यासाठी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे हरेगाव ला येत्या दि. 1 सप्टेंबर रोजी भेट देणार आहेत अशी माहिती रिपाइं चे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली आहे.