केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा; राज्यातील तरुणांना मिळणार रोजगार 

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn project) आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा एक प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क(Bulk Drugs Park) या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात आता  मोठे प्रकल्प (Maharashtra Industries) येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajiv Chandrashekhar) यांनी ही माहिती दिली आहे.

इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.  त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले असून या संदर्भात दिल्लीत आज घोषणा करण्यात आली आहे, गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे समजते. दरम्यान, दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतीच दिल्लीत ही घोषणा केली आहे.