आमदार अमोल मिटकरींना पडतायेत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे स्वप्न ?

अंबेजोगाई – राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषद सदस्य तथा राज्याच्या राजकारणात राजकिय थिल्लरपणा करत नको त्या मागण्या आणि नको ते आरोप करून प्रसिद्धीसाठी धडपडणारे अमोल मिटकरी यांना रात्रीच्या साखरझोपेत आता अनेक स्वप्नांनी ग्रासले असुन पक्षाचं प्रदेश अध्यक्ष पद यावर त्यांचा डोळा आहे की काय? या तोर्‍यात त्यांची भुमिका जनतेला दिसु लागली. इतर पक्षातल्या नेतृत्वाला पक्षात येण्याचे आमंत्रण मिटकरी देवु लागले तेव्हा उंटाचा मुका घेण्याची उंची नसताना सुरू असलेली धडपड केवळ प्रदेश स्तरावरचं नेतृत्व करण्यासाठीच म्हणावी लागेल. पुर्वी अनेक प्रश्नावर वादग्रस्त ठरल्यानंतर नेतृत्वाने समज देवुनही पुन्हा बिगर वेसणीचा घोडा धावताना दिसतो. याचा अर्थ त्यांच्या पोटात काय? हे न समजण्याएवढी जनता दुधखुळी नाही.असं भाजपचे राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले, अमोल मिटकरी हा चेहरा अलीकडे वेगवेगळ्या प्रसंगात अनेक प्रश्नावर राज्याच्या राजकारणात चर्चेला येताना दिसतो. मागे वळुन पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारवंत अशी त्यांची ओळख होती. त्यांच्याकडे असलेली वक्तृत्व कला आहे पण संघटन नाही. तात्पुरत्या प्रसंगानुरूप त्यांचा वर्तमानकाळात फायदा घेण्यासाठी कदाचित राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी विधान परिषदेवर संधी दिली. पण एवढ्यावर त्यांचे समाधान झालेलं दिसत नाही. आमदार झाल्यापासुन रोज त्यांच्या तोंडून येणारे वादग्रस्त शब्द अनेक वादाला तोंड देतात. एक तर स्वत:ला पक्ष नेतृत्वापेक्षा वेगळं बघण्याची भुमिका त्यांची असते. म्हणुन जाहिर कार्यक्रमात आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळताना बोलण्याचं भान त्यांना रहात नाही. ज्यातुन वाद उभा रहातात. मध्यंतरी सांगलीच्या जाहिर कार्यक्रमात ब्राह्मण समाजावर केलेली टिका तेही प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या ब्राह्मण समाजाला संताप आणणारी आहे.

विदुषकाच्या खेळाप्रमाणे ब्राह्मण व्यवस्थेवर टिका करून त्यांनी नको त्या शब्दाचे उच्चारण केलं. वास्तविक पहाता ज्यांच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आहे अशांच वर्तन आणि आचरण हे खर्‍या अर्थाने जात व्यवस्थेपेक्षा पलीकडचं असणं महत्वाचं असतं. पण या महाशयांना कशाचंही भान रहात नाही. अधुनमधुन सतत टिका करणं हे त्यांच्या स्वभावातलं स्वप्रसिद्धी कारण ठरतं. थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते टिका करतात. आता टिका करताना आपण कोण? आपली पात्रता काय? आपली उंची किती? याचं भान प्रत्येक राजकिय नेत्याला असणं महत्वाचं असतं. दुसरं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नाव रोज एकदा तरी पेपरात यावं, टिव्हीवर गाजावं म्हणुन त्यांची धडपड सुरू असते. त्याचाच एक भाग म्हणुन भाजप नेतृत्व अर्थात देवेंद्र फडणवीसांना टिकेचे लक्ष्य बनवताना दिसतं. वास्तविक पहाता राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाकडून मिटकरींना प्रदेश नेतृत्वाची मान्यता अजुन दिलेली नाही. कदाचित प्रवक्ता पद ही जबाबदारी पक्षाचे ध्येय धोरणे मांडण्यासाठी दिलेली असेल तो भाग वेगळा पण या महाशयांनी आपण प्रदेश पातळीवरचे नेते अगदी अजितदादापेक्षाही मोठे या तोर्‍यात वागताना परवा तर भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात आमंत्रण दिलं. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एखाद्या मोठ्या नेत्याला जाहिर आमंत्रण देण्याएवढी आपली उंची आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठ्या साहेबांनी किंवा अजितदादांनी असं बोलायला लावलं का? आणि नाही हे उत्तर असेल तर मग हे महाशय कुठल्या स्वप्नात रंगुन जातात? की दुसर्‍या पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण देतात.

खरं तर अधुनमधुन त्यांच्या राजकिय थिल्लरपणाचं लक्षणे बाहेर पडतात. दुसरी महत्वाची म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत प्रदेश अध्यक्षाकडे देखील तक्रारी केल्याची चर्चा विदर्भात फिरल्यानंतर कानावर पडते. छातीफाड बोलणार्‍याची कॉलर टाईट असते पण अंगातला कमीशनपणा किती बहादुरीचा असतो याचं आत्मपरीक्षण खर्‍या अर्थाने मिटकरी सारख्या आमदारांनी करायला हवं. एक गोष्ट ठिक आहे अनेक कलागुणा त्यांच्या अंगी असतील पण त्याचं जास्तीचं प्रदर्शन राजकिय पटलावर लोकांना आवडत नसतं. भाजप नेतृत्वावर टिका करताना कधी शाहिरी म्हणतात तर कधी लावणीचे बोल गातात. चंद्रकांत दादा पाटलांवर मध्यंतरी अनेकदा घेतलेलं तोंडसुख त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. खरं तर शिंदे-फडणवीस सरकारनी अशा राजकिय कलाकारांवर मनोरंजन कर लावला तर मग उत्पन्नात भर पडेल आणि त्यातलं काही कमिशन अशा कलाकारांना सहज देणे शक्य होईल. आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवारांनी एक-दोन वेळा त्यांना समजही दिल्याचे ऐकिवात येते. पण तरीही त्यांचा तोंडसुख घेण्याचा सपाटा सुरूच असतो.

काय तर म्हणे? मिटकरींना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पद मिळवायचं आहे. तशा प्रकारचे स्वप्न त्यांना पडु लागले की काय? म्हणुनच राज्य स्तरावर घुसण्याची त्यांची असलेली धडपड ज्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या अंतर्गत कुजबुजही सुरू आहे. पण या मिटकरीरावांना भलतेच स्वप्न पडु लागले म्हणुन बेछुट आरोप करत आपल्या उंचीपेक्षा जास्त उंची दाखवताना उगीच राजकिय अवसान आणण्याचा त्यांचा असलेला खटाटोप खर्‍या अर्थाने वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू असल्याचे लक्षात येतो. पण या राज्यात मिटकरीसारखे अधुनमधुन नेते उगवतात फुगा फुटला की जिरूनही जातात. रोज टिव्हीसमोर येत कावळ्याच्या शापाप्रमाणे त्यांची कावकाव सुरू असते. अहो, कालच्या अधिवेशनात लोकशाहीच्या मंदिरात पायर्‍यावर त्यांनी घातलेला धिंगाणा खरंच राजकियदृष्ट्या लाजीरवाणा म्हणावा लागेल. आपला चेहरा रोज एकदा टिव्हीवर दिसावा याच अहंभावाने पेटलेली ही व्यक्ती ज्याचा सुज्ञ नागरिकांना विट येणे साहजिकच. कारण लोकांना उगीच आरोप करणार्‍या राजकिय पुढार्‍याची घृणा येते हे मध्यंतरी शिवसेनेच्या एका नेत्याच्या भुमिकेतुन महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेलं आहेच. बाकी काही असलं तरी अमोल मिटकरी यांची सुरू असलेली धडपड त्यांच्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी लक्षात घ्यावी आणि प्रदेश अध्यक्ष पदावरून जयंतराव पाटलांना बाजुला करून अमोल मिटकरींना बसवावं म्हणजे रात्रीचं स्वप्न दिवसा सत्यात उतरेल असं त्यांना वाटेल हे नक्कीच.असं कुळकर्णी यांनी म्हटले आहे.