देवेंद्र फडणवीसांनी केली कानउघडणी, आता बच्चू कडूंसोबतच्या वादावर राणा म्हणतात… 

मुंबई: आमदार बच्चू कडू आणि रवी राणा (ravi rana) यांच्या वादावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (devendra fadnavis) यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा वाद मिटला आहे. खुद्द आमदार रवी राणा यांनी हा आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगत हा वाद संपल्याचं म्हटलं आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता, शब्दाशब्दांमधून वाद सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साडेतीन तास बैठक झाली. जे काही वाद झाले, जे काही शब्द वापरले गेले त्यावरून वाद झाला होता. ते शब्द मी मागे घेतो. आता बच्चू कडू आणि मी अमरावतीचे आमदार आहोत. बोलता बोलता तोंडातून जे काही गुवाहाटीबद्दल निघालं, शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, नेते, सहकारी आहे, ते सगळे आमच्या सोबत आहे. त्यामुळे गुवाहाटीबद्दल काही बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो’ अशा शब्दांत रवी राणांनी यू-टर्न घेतला.

दरम्यान, राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडू (bacchu kadu)यांनी आपले शब्द मागे घेतले नाही किंवा हा वाद मिटल्याचं स्पष्टपणे सांगितलं नाही. आज कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बच्चू कडू काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.