कोविड विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे आव्हान चिंता वाढवणारे आहे – शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु कोविड विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरियंटचे आव्हान चिंता वाढवणारे आहे. सध्या जिल्ह्यात संक्रमण नसून भविष्यात याचा संसर्ग होणार नाही यासाठी आरोग्य विभागाबरोबर संबंधित यंत्रणांनी आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

ओमायक्रॉनचा संसर्गाचा धोका पाहता आरोग्य विभागातील सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले, ओमायक्रॉनची माहिती होण्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घ्या. या बैठकीमध्ये ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या परिणामाची माहिती द्या. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्याची संख्या मोठी आहे, परंतु दुसरा डोस घेणाऱ्याची संख्या कमी आहे. पुढील धोका पाहता लसीकरणाची गती वाढवा. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोस घेतला नाही तसेच एकही डोस न घेणाऱ्या नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.

हे देखील पहा