शाहू महाराजांच्या जनतेप्रती प्रेमामुळेच ते लोकराजे झाले; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – राजर्षी शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. केवळ राजवाड्यात बसून भाषण देण्याचे काम केले नाही. उलट जनतेमध्ये जाऊन, त्यांचे दु:ख दूर केले. त्यामुळे जनतेप्रती असलेल्या प्रेमामुळेच आणि आचरणामुळेच ते लोकराजे झाले, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP state president Chandrakant Patil)  यांनी आज केले.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भाजपा राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी (BJP National General Secretary and Maharashtra in-charge CT Ravi) यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठ परिसरातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्याचबरोबर 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ(murlidhar mohol), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर(doc. nitin karmalkar), प्र कुलगुरू एन. एस उमराणी सर, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, आनंद छाजेड, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, प्रतुल जागडे, राजेश नायडू, प्रदीप मोरे,विश्वास गुंड पाटील, राहुल जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज(Rajarshi Shahu Maharaj)  यांनी आपले राजे होण्याचा जनतेच्या विकासासाठी, प्रबोधनासाठी, सुखासाठी उपयोग केला. ते राजे म्हणून जगलेच नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी त्यांना जेव्हा समजले, तेव्हा त्यांच्या मुंबईच्या चाळीतील घरी जाऊन डॉ. बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यासोबतच कोल्हापुरातून जाती प्रथा निर्मुलानासाठी जे कार्य केले, ते नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहिले. केवळ राजवाड्यात बसून भाषण केले नाही. तर आपल्या कृतीतून त्यांनी समाजात अनेक आदर्श निर्माण केले.

ते पुढे म्हणाले की, शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांनी हे देऊ केलेले आरक्षण १९६८ पर्यंत टिकलं. पण त्यानंतर ते कुठे गायब झालं, हे कुणालाही समजलं नाही. महाराजांनी आपल्या कार्यकाळात लागू केलेला शिक्षण हक्क कायदा आजही लागू करु शकलो नाही. कारण, या कायद्यान्वये जे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत, त्या पालकांना दंड करण्याचा अधिकार होता. त्यामुळे अशा लोकराजाला केवळ आदरांजली वाहण्याऐवजी, त्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.