मला डायरेक्ट मारायचं होतं की जखमी करायचं होतं ? चंद्रकांत पाटलांचा थेट सवाल

Pune – महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता. या तिघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे. दरम्यान, याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, घडलेला प्रकार प्री प्लान होता. याचे सगळे पुरावे आता कागदावर आले आहेत. या निमित्ताने मी सुषमा अंधारे यांनाही तेच म्हटलं. निषेध करायचा होता की मला जखमी करायचं होतं. माझ्या डाव्या डोळ्याला कॅन्सर होता. माझ्या डोळ्यातला एक भाग गोधडीसारखा शिवलेला आहे.

बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट कायद्याने होणार. पण तुम्ही कायदा हातात घेतला. मला डायरेक्ट मारायचं होतं की जखमी करायचं होतं की, ही निषेधाची पद्धत आहे का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला. आज आम्ही कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने केली. कलेक्टर यांना सगळे पुरावे दिले. नेम धरून डोळ्यावर शाई फेकली. माझ्या डॉक्टरने पाहिल्यानंतर डॉक्टर अस्वस्थ झाले. डॉक्टर म्हणाले, तुम्ही दवाखान्यात येईपर्यंत मी घरी जाणार नाही. मी रात्री बारा वाजता दवाखान्यात गेलो.असं देखील त्यांनी सांगितले.